अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अब्रुनुकसानी विषयी
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला काहीना काही साध्य करायचे असते. पैसा, घर, गाडी, याव्यतिरिक्त आपला नावलौकिक व्हावा व आपली समाजात प्रतिष्ठा वाढावी यासाठी आपण सर्वच जण धडपडत असतो. व कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा जपण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. इतर कोणत्याही मालमत्तेपेक्षा प्रतिष्ठा आपल्यासाठी अधिक मोलाची असते. जर कोणत्याही कारणाने एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले तर त्या धक्क्याने ती व्यक्ती आयुष्यातून उठू शकते. समाजात एकदा घसरलेली पत पुन्हा मिळविणे हे पैसा मिळविण्यापेक्षाही कठीण काम आहे. त्यामुळेच जर एखाद्या व्यक्तीची कुणीही खोटेनाटे आरोप करून समाजात कोणत्याही प्रकारे निंदानालस्ती करत असेल तर अशा व्यक्ती विरुद्ध पिडीत व्यक्ती अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू शकते. या लेखामध्ये आपण विचार स्वातंत्र्य व अब्रुनुकसानीचा कायदा या विषयी जाणून घेणार आहोत. मानहानी म्हणजे काय ? मानहानी म्हणजे दुसर्या व्यक्तीच्या चांगल्या प्रतिष्ठेला इजा करणे. एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करणे, मुद्दाम खोटी/ चुकीची/वाईट बातमी पसरवणे, बदनामी करणे, त्या व्यक्ती विरूद्ध बदनामीकारक साहित्य प्रकाशित करणे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, कीर्तीला हानी, इजा पोहचवण्याच्या हेतूने किंवा हेतुपुरस्सर खोटी विधाने करणे. हे केवळ त्या व्यक्तीच्या खाजगी जीवनात नव्हे तर त्याच्या सामाजिक प्रतिमेस व त्याच्या व्यवसाय, रोजगार, इ. यांना देखील इजा पोचवते. ही मानहानी/बदनामी दोन प्रकारे होते. लेखी स्वरूपात – जेव्हा ही बदनामी लिखित अथवा मुद्रित स्वरुपात असते, उदा. लेखन, छापील, ईमेल, चित्रे, भिंतीवरील चित्रे/खडूची चिन्ह, चिन्हे, व्यंगचित्र, पुतळा, मेणiचा पुतळा इ. या बदनामी विरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी ती सार्वजनिक ठिकाणी प्रसारित केली जाणे आवश्यक आहे. भाषण, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, व्हिडिओ, ऑडिओ संवादाद्वारे शब्दांचे प्रसारण कायम स्वरुपाचे असते. ह्या बदनामीमध्ये फिर्यादीला कोणतेही विशिष्ट अर्थिक नुकसान सिद्ध करावे लागत नाही.कारण जनमानसात मुद्रित अथवा इलेक्ट्रोनिक्स माध्यमात वाचलेल्या, ऐकलेल्या व दिसणार्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती अधिक आहे. शाब्दिक स्वरूपiत- निंदा, हातवारे ही तात्पुरत्या स्वरूपाची बदनामी असते. अशाप्रकारच्या बदनामी मध्ये फिर्यादीला वास्तविक हि बदनामी झाली आहे कि नाही किंवा आर्थिक नुकसान भरपाई सिद्ध करावी लागते. केवळ खाली नमूद केलेल्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा दावा दाखल करता येत नाही. फिर्यादीवर फौजदारी गुन्ह्याचा आरोप असल्यास, फिर्यादीस सांसर्गिक रोग झाल्याचा आरोप केला असल्यास (ज्याचा इतरांना फिर्यादीशी संगत करण्यापासून रोखण्यास होतो), नोकरी, व्यवसाय किंवा व्यापार यांच्या संदर्भात व्यक्ती अक्षम, अप्रामाणिक किंवा अपात्र आहे असा आरोप असल्यास, कोणत्याही स्त्री किंवा मुलीशी अनैतिक वर्तन किंवा व्यभिचार केल्याचा आरोप असल्यास. भारतीय राज्य घटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अब्रुनुकसानीचा कायदi. मानहानी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुसार, सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळण्याचा हक्क आहे. जिथे सर्व नागरिकांना, विचारांचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. या अधिकाराचा उपयोग भारतीय राज्यघटनेच्या अन्वये ठराविक उद्दिष्टांसाठी "वाजवी निर्बंध" च्या अधीन आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे मुख्य घटक म्हणजे हा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे, परदेशी नागरिकांना नाही. बोलण्याचे स्वातंत्र्य, कोणत्याही मुद्द्यावर एखाद्याचे विचार आणि मते कोणत्याही माध्यमांद्वारे व्यक्त करण्याचा अधिकार समाविष्ट करतात, उदा. शाब्दिक, लेखन, छापील, चित्र, चित्रपट, व्यंगचित्र इत्यादी. तथापि, हा अधिकार परिपूर्ण नाही. कारण भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या हितासाठी, राज्याची सुरक्षा, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नैतिकता जपणे, कोर्टाचा अवमान व मानहानीचा प्रकार आणि एखाद्या गुन्ह्यास उद्युक्त करण्याचा, यांच्या दृष्टीने वाजवी निर्बंध लादण्यासाठी आपली राज्यघटना सरकारला कायदे तयार करण्यास परवानगी देते. पत्रकारितेचे स्वातंत्र्य- लोकशाही यंत्रणेत पत्रकार/वृत्तपत्र/प्रसारमाध्यमे यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पत्रकार/वृत्तपत्र/प्रसारमाध्यमे यांना प्रकाशन स्वातंत्र्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य आणि सेन्सॉरशिपविरूद्ध (censorship) स्वातंत्र्य समाविष्ट आहे. बोलण्याच्या स्वातंत्र्यामध्ये प्रिंट माध्यमांद्वारे किंवा इतर कोणत्याही चॅनेल उदा. रेडिओ, टेलिव्हिजन याद्वारे लागू केलेल्या वाजवी निर्बंधाद्वारे एखाद्याच्या मतांचा प्रसार करण्याचा अधिकार समाविष्ट आहे. व्यावसायिक भाषणाचे स्वातंत्र्य- व्यावसायिक जाहिरात किंवा व्यावसायिक भाषण हा देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. जाहिरात, जाहिरातींद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. लोकशाही अर्थव्यवस्थेत, व्यावसायिक माहितीचा मुक्त प्रवाह अपरिहार्य आहे. प्रसारणiचे अधिकार- तंत्रज्ञानातील प्रगतीसह संकल्पना, भाषण आणि अभिव्यक्ती विकसित झाली आहे. प्रसारणiची सर्व साधने उपलब्ध आहेत. यात इलेक्ट्रॉनिक आणि प्रसारमाध्यमांचा समावेश आहे. टीका करण्याचा अधिकार – सर्वसामान्य लोकाना कोणत्याही विषयावर त्याचे मत मांडण्याचा मूलभूत अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, दुसर्या व्यक्तीची प्रतिष्ठा किंवा प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ नये. याची काळजी आपण घ्यायला हवी. एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला इजा पोहोचवणारे/बदनामीचे विधान करु नये. कोणतीही हक्का बरोबर जबाबदारी ही येतेच. म्हणूनच भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आणि मानहानीचा कायदा ह्य्या दरम्यान एक पुसट सीमारेषा आहे. भारतात, मानहानी हा दिवाणी व फौजदारी गुन्हा आहे. दिवाणी खटल्यामध्ये फिर्यादी पक्षाला नुकसान भरपाईची सुविधा प्रदान केली जाते. आपण आपल्या बदनामीसाठी कायदेशीर नुकसान भरपाई मिळविण्यासाठी त्या व्यक्तीवर दावा दाखल करू शकतो. मानहानीचा दिवाणी खटला दाखल करण्यासाठी फिर्यादीवर दावा केलेल्या रकमेच्या आधारे दिवाणी न्यायालयात शुल्क भरावे लागते. दिवाणी न्यायालयात बदनामीचा खटला, घटना घडल्याच्या तारखेपासून एक वर्षच्या आत दाखल करु शकतो. फौजदारी गुन्हा कायद्यांतर्गत मानहानी करणे हा जामीनपात्र, अदखलपात्र आणि आपसात मिटविण्याजोगा(compoundable)गुन्हा आहे. मानहानीची तक्रार थेट पोलिस अधिकार्याकडे करता येत नाही (एफआयआर दाखल करता येत नाही) परंतु खाजगी तक्रारीद्वारेच न्यायिक दंडाधिकार्याकडे केली जाते. न्यायदंडाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन त्या संबंधित व्यक्तीस (Summons)समन्स बजावू शकतात व फौजदारी गुन्हा कायद्यांच्या प्रक्रियेनुसार कार्यवाही करू शकतात. न्यायिकदंडाधिकायाच्या आदेशाशिवाय पोलिस मानहानीचा तपास करू शकत नाहीत. लेखी व शाब्दिक स्वरूपाची मानहानी या दोन्ही गोष्टींचा फौजदारी गुन्हात समावेश होतो, दोन्हीमध्ये फरक केला जात नाही. ही तक्रार मानहानीची घटना घडलेल्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत दाखल केली जाऊ शकते. फौजदारी तक्रारीत कोर्टाची फी नगण्य आहे. मानहानीची शिक्षा दोन वर्षापर्यंत किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. ज्या कोणी या बदनामीकारक वक्तव्य अथवा चित्र असलेली कोणतीही छापील किंवा कोरीव वस्तू विकल्यास किंवा विक्रीसाठी ठेवल्यास त्याला दोन वर्षापर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते. फौजदारी मानहानी खटला दाखल करण्यास आवश्यक असणाऱ्या गोष्टी : 1. त्या व्यक्तीला उद्देशून केले असणे आवश्यक आहे. 2. विधान बदनामीकारक असले पाहिजे ज्यामुळे फिर्यादीची प्रतिष्ठा कमी होते. 3. विधान खोटे असणे आवश्यक आहे. 4. विधान लेखी अथवा शाब्दिक स्वरूपiत असणे आवश्यक आहे. 5. विधानाचा उद्देश हानी करण्याचा असणे आवश्यक आहे. 6. विधान द्वेषाने किंवा वाईट हेतूने असणे आवश्यक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत मानहानीच्या कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करता येत नाही. सार्वजनिक हितासाठी खरे बोलणे आणि सार्वजनिक हितासाठी चांगल्या हेतूने केलेले प्रकाशन, सार्वजनिक सेवा खात्यावर केलेली योग्य टीका/मत, सार्वजनिक सेवकाव्यतिरिक्त इतर लोकांच्या सार्वजनिक वर्तनाविषयी योग्य टिप्पणी/मत, न्यायालयाच्या कार्यवाहीचा खरा अहवाल/निकाल/निर्णय जाहीर करणे, गुणवत्तेच्या खटल्यातील निर्णय किंवा साक्षीदारांचे आचरण, सार्वजनिक कामगिरीची गुणवत्ता, सार्वजनिक हितासाठी कायदेशीर अधिकारयावर केलेस, स्वत:च्या हिताच्या संरक्षणासाठी, एखाद्या व्यक्तीला दुसर्या विरुध्द दिलेला सावधगिरीचा संदेश, व्यक्तीच्या किंवा लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केली असल्यास ती बदनामी नाही. व्यक्तीगत मत खरे किंवा खोटे असू शकत नाही कारण ते व्यक्तिनिष्ठ असते आणि म्हणून त्यामुळे बदनामी होऊ शकत नाही. कोणतीही कंपनी, संघटना किंवा लोकांच्या गटाबद्दल बदनामीकारक विधान केल्यास अधिकृत व्यक्ती न्यायालयात खटला दiखल करू शकते. कोणत्याही मृत व्यक्तीची बदनामी केल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा जवळच्या इतर नातेवाईकांच्या भावना दुखावल्या गेल्यास, कुटुंबातील जवळचे नातेवाईक न्यायालयात खटला दiखल करू शकतात. मानहानीचा कायदा वैयक्तिक प्रतिष्ठा वाचविण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या व्यक्तीचा त्यांच्या बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी मानहानीचे कायदे बनवले गेले आहेत. मानहानीचा कायदा, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी हिताच्या आहेत व आपल्या समाजासाठी खूप महत्वाच्या आहेत. प्रतिष्ठा ही प्रत्येकाची मालमत्ता आहे. अशा मालमत्तेचे कोणतेही नुकसान करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. कोणत्याही व्यक्तीने आपल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या अधिकारांचा वापर करताना इतरांच्या हक्कांना अडथळा येवू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. भारतीय नागरिक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. या वेबसाइटवरील सर्व माहिती चांगल्या हेतूने आणि केवळ सामान्य नागरीकांच्या माहितीसाठी प्रकाशित केली गेली आहे. अॅड. आलोका अ नाडकर्णी