बाल-रक्षा

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने "बाल-रक्षा" विशेष उपक्रम
मा. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय आणि युनिसेफ (United Nations International Children Emergency Fund) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल-रक्षा’ हा विशेष उपक्रम बालकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात लहान मुलांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय बनला आहे. पोलीस प्रशासन बालकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध असून, युनिसेफच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश बालहक्क आणि संरक्षणाविषयी जनजागृती करणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत—
*पोलीस विभागातील बालसंबंधित शाखांना अधिक सक्षम करण्यासाठी तांत्रिक मदत
*विद्यमान कार्यपद्धतीचे मूल्यांकन आणि सुधारणा
*प्रत्येक पोलीस ठाण्यात मुलांसाठी विशेष जागा निश्चित करणे
*बालसुरक्षेसाठी पोलिसांची क्षमता विकसित करणे
*कम्युनिटी पोलीसिंग कार्यक्रमांचे आयोजन
*इतर संबंधित विभागांचे सहकार्य घेणे , युनिसेफ या सर्व बाबींमध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयास मदत करणार आहे.
‘बाल-रक्षा’ उपक्रमाचे उद्घाटन २५ मार्च २०२५ रोजी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त कार्यालयात संपन्न झाले, तसेच, आयुक्तालय परिसरातील डॉक्टर, वकील, शाळांचे प्राचार्य आणि प्रतिष्ठित नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. पोलीस आयुक्त श्री. मधुकर पांडेय यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, "लहान मुले हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या सर्वांगीण आणि सुरक्षित वाढीसाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय पूर्णपणे कटिबद्ध आहे."
‘बाल-रक्षा’ हा उपक्रम लहान मुलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.